| रेवदंडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील ताराबंदर समुद्रकिनारी अनधिकृत भराव आणि कांदळवनाची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू असताना प्रशासनाने पूर्णपणे मौन धरले आहे. याचवेळी पारंपरिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी हटवण्याचे आणि प्रवेश निषिद्ध फलक लावण्याचे आदेश देऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून धमकावणी सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लहर उसळली असून, भूमाफियांच्या जाळ्यात प्रशासन अडकल्याचा आरोप होत आहे.
ताराबंदर ग्रामस्थ मंडळाचे सचिव प्रतीक प्रमोद कणगी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे आणि कर्मचारी अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला. अभिजीत पाटील यांनी मात्र बोटी हटवण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याचे मान्य केले, पण जेसीबी आणि पोकलेन मशिनद्वारे रात्रीच्या आडोशाला केलेल्या अनधिकृत भरावांवर कारवाईबाबत स्पष्ट उत्तर दिले नाही.

ग्रामस्थांनी सांगितले, गट क्रमांक, सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) नियमांची माहिती देण्यासही त्यांनी नकार दिला. हे दुहेरी मापदंड स्पष्टपणे दिसत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कांदळवनाची कत्तल पर्यावरणाला धोकादायक आहे. हे वन क्षेत्र मच्छिमारांच्या उपजीविकेचा आधार असून, येथील जैवविविधता नष्ट होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. रात्री भराव चालू असताना वनविभागाचे कर्मचारी मच्छिमारांना धमकावतात, पण खऱ्या गुन्हेगारांना सोडून देतात, असे ग्रामस्थांचे मत आहे.
प्रतीक कणगी यांनी स्पष्टपणे सांगितले, लेखी आदेशाशिवाय मच्छिमारांचे हक्क हिरावले तर आम्ही उच्च अधिकाऱ्यांपर्यंत, जिल्हाधिकारी, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक आणि पर्यावरण मंत्रालयापर्यंत प्रकरण घेऊन जाणार आहोत. ग्रामस्थ मंडळाने केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारकडे भूमाफियांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ग्रामस्थ मंडळाने आता केंद्र आणि राज्य विभागांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली असून, अनधिकृत धंद्यांवर आळा घालण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मच्छिमार हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून कांदळवन संरक्षण आणि मच्छिमारांच्या हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भूमाफियांचे जाळे आणि तस्करीचा संशय राजकीय पुढाऱ्यांचा आणि श्रीमंत धनदांडग्यांचा मेळ घातला असून, येथे जेट्टी बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जेट्टीमधून डिझेल, वाळू आणि गावठी दारू यांची तस्करी होणार असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ही अनधिकृत कामे भूमाफियांच्या फायद्यासाठी सुरू आहेत. मच्छिमारांच्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या समुद्री उपजीविकेवर हा थेट हल्ला आहे, असे स्थानिक मच्छिमार नेते म्हणाले. ताराबंदर परिसर पारंपरिक मासेमारीचा केंद्रबिंदू आहे. येथील कुटुंबे केवळ मासेमारीवर अवलंबून आहेत. अनधिकृत भरावांमुळे समुद्रकिनारा अरुंद होत असून, मासे पकडण्याची जागा कमी होत आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, ही कामे कायद्याने बंद असलीतरी पैशाच्या जोरावर सुरू आहेत.






