मास्क घातला नाही म्हणून केली कारवाई; आमदार साहेबांनी केली पोलीस अधिकाऱ्याचीच बदली

खोपोली | संतोषी म्हात्रे |

मास्क न घातल्याने कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी थेट आमदारच रस्त्यावर उतरले होते. आ. महेंद्र थोरवे यांच्या सुरभी ज्वेलर्समध्ये मास्क न घातल्याने सपोनि सतीश आस्वर यांनी कारवाई केली. ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत आमदारांनी आस्वर यांची बदली करण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी खच्चीकरण करणार असतील तर काम कसे करायचे असा सवाल पोलिसांकडून केला जातोय.

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे खोपोलीत सुरभी ज्वेलर्स आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार मास्क घालणे बंधनकारक असताना सुरभी ज्वेलर्समध्ये असलेल्या दोन महिला ग्राहकांनी मास्क परिधान केला नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर आणि त्यांच्या पथकाला दिसले. आस्वर यांनी या प्रकरणी कारवाई केली. पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत खोपोली ज्वेलर्स असोसिएशनने या घटनेचा निषेध करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती अध्यक्ष कांतीलाल पोरवाल यांनी दिली. सुरभी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर यांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सतीश आस्वर यांनी कारवाई केल्याचे मान्य करत मारहाण केल्याचा आरोप मात्र फेटाळून लावला आहे. आपण मास्क नसल्याने कारवाई केल्याचे आस्वर यांनी स्पष्ट केले. सदर दुकान आ. महेंद्र थोरवे यांचे असल्याचे कळल्यानंतर आस्वर यांनी आमदारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे कळते. मात्र झालेली कारवाई चुकीची असल्याने आमदार थोरवे यांनी सतीश आस्वर यांची तात्काळ बदली करण्याची मागणी लाऊन धरली होती. बदली झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही आमदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सतीश आस्वर यांची अलिबाग मुख्यालयात बदली झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर यांनी मास्क नसल्याने कारवाई केली होती. कारवाई करताना त्यांच्याकडून चूक झालीही असेल. झालेल्या घटनेबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असताना त्यांची बदली व्हावी यासाठी थेट आमदारच रस्त्यावर उतरणार असतील तर कोरोनाच्या संकटात मोठ्या धैर्याने कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य खचणार नाही का, लोकप्रतिनिधी अशा प्रकारे हस्तक्षेप करणार असतील तर पोलिसांबरोबरच अन्य यंत्रणा कशा काम करणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मास्क नसल्याने कारवाई केलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याने कारवाईच्या भितीने अशाप्रकारे कारवाई करायला कोणीही धजावणार नाही असेही बोलले जातेय.

Exit mobile version