। खोपोली । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात खंडणी विरोधी पथकात कार्यरत असणारे शिरीष पवार यांची खोपोली पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. पवार यांनी पदभार स्वीकारताच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी भेट घेवून शुभेच्छा देत स्वागत करताच ते भावूक झाले होते.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांची नुकतीच मीरा भाईंदर येथे बदली झाली. क्षीरसागर यांची बदली झाल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्याला नव्या अधिकार्याची प्रतीक्षा होती. काही दिवस सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आसवर यांच्याकडे पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता.
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात खंडणी विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांची खोपोली पोलीस ठाण्यात बदली झाली. गुरुवारी संध्याकाळी पवार यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यावर शेकापक्षाचे जिल्हासह चिटणीस किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, शिवसेना शहर प्रमुख तसेच गटनेते सुनिल पाटील, नगरसेवक राजू गायकवाड, शिवसहकार संघटनेचे संघटक हरिश काळे, केटीएसपी मंडळींचे सदस्य चंद्रकांता केदारी, भास्कर लांडगे, दिलीप पोरवाल, जयवंत पाठक आदींनी त्यांचे स्वागत केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शिरीष पवार यांनी व्यक्त केला.