तुकाराम मुंढेंचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
दूध, पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाकडे मोर्चा वळवला आहे. खाद्यतेलाच्या दर्जाबाबत कठोर तपासणी सुरू करण्यात आली असून, अनधिकृत मिश्रण, मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग आणि सुटे तेल विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत खाद्यतेलासाठी नवीन अनुपालन आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. उत्पादकापासून किरकोळ विक्रेत्यापर्यंत आणि ऑनलाइन विक्रेत्यांपर्यंत सर्वांना हे नियम लागू राहणार आहेत. खाद्यतेलात भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमांनुसार सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा आणि भेसळप्रकरणी 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
