मुरूडच्या मुख्याधिकाऱ्यांची महत्वपुर्ण भुमिका
| आगदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरामध्ये पर्यटकांसह नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. या वर्दळीच्या ठिकाणी उनाड गुरांचा वावर वाढल्याने नागरिकांना त्यांचा त्रास कायमच होत आहे. अनेकवेळा वाहतूक कोंडीदेखील होत असते. रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांमुळे होणारा त्रास रोखण्यासाठी आता मुरूड नगरपरिषदेने कडक पाऊल उचलले आहे. उनाड गुरांची जप्ती करून त्यांना गोशाळेत पाठविले जाईल. तसेच, रस्त्यावर गुरं सोडली तर थेट कारवाई केली जाईल, असा महत्वपुर्ण निर्णय मुरूडचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन बच्छाव यांनी घेतली आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ ओळखले जाते. मुरूडच्या समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे वर्षाला 5 लाखहून अधिक पर्यटक मुरूडला भेटी देतात. मुरूड पर्यटनाबरोबरच एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून नावारुपाला आले आहे. मुरूड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकीकरणदेखील झपाट्याने वाढू लागले आहे. मुरूड शहरात बाजारपेठेचा विस्तार झाल्याने मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे वाहनांची व नागरिकांची वर्दळ शहरामध्ये नेहमीच वाढलेली दिसते. परंतु, उनाड गुरांचा उपद्रव शहरात वाढला आहे. उनाड गुरांमुळे अपघात होण्याबरोबरच वाहतूक कोंडी आणि अपघातही होतात. अनेकवेळा गुरांच्या मलमुत्रांमुळे अस्वच्छतादेखील निर्माण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्य बिघडण्याची भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे नागरिकांना या उनाड गुरांचा प्रचंड त्रास होत आहे. रस्त्यावर उनाड गुरांचा वावर वाढण्याच्या तक्रारी मुरूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन बच्छाव यांच्याकडे प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी बच्छाव यांनी उनाड गुरांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे. उनाड गुरांमुळे नागरिकांना त्रास झाल्यास त्याची थेट जबाबदारी गुरे मालकांची राहणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 नुसार त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोकाट गुरांना गोठ्यातच ठेवा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा बच्छाव यांनी गुरे मालकांना दिला आहे. तसेच, गुरांना ताब्यात घेऊन त्यांना गो शाळेत अथवा त्यांची जप्ती करून लिलाव केला जाईल, अशी सक्त ताकीद देखील देण्यात आली आहे.
रस्तावर बसलेल्या गुरांमुळे नागरिकांना खुप त्रास होत आहे.छोटे-मोठे अपघात होत आहेत. शहरात अस्वच्छता पसरत आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत.गुरे मालकांनी आपली गुरे आपल्या गोठ्यात सांभाळून ठेवावी. रस्त्यावर सोडु नये. जर सोडलात तर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करुन पेण येथील गोशाळेत पाठवून देऊ.ही वेळ आपल्या वर येऊ नये त्याकरिता गुरे मालकांनी काळजी घ्यावी. अन्यथा कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
सचिन बच्छाव,
मुख्याधिकारी तथा प्रशासक, मुरूड







