आरएमसी प्लांटवर कारवाई होणार

। पालघर । प्रतिनिधी ।

वसई-विरार शहरातील प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आणखी पाच अनधिकृत आरएमसी प्लांटविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेली आहे. यात जिजाऊ कन्स्ट्रक्शन, सुपर रेडिमिक्स एल.एल.पी., वायब्रंट कन्स्ट्रक्शन, सरदार आर.एम.सी. क्राँक्रिट, ए.एस. इन्फ्रा अशा पाच प्लांटवर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वसई-विरार महानगरपालिकेचे विशेष नियोजन प्राधिकरणाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी दिली आहे.

मालजीपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांतून पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नाहीत. तसेच, प्रदूषण रोखण्याची कोणतीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. याचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. याशिवाय मालजीपाडा येथील ग्रीन झोन व नॉन डेव्हल्पमेंट झोनमध्ये तसेच तिवरांच्या झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणावर माती भराव करून अनधिकृत बांधकामे झालेली असल्याने महापालिकेविरोधात पुणे येथील राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पांना नोटिसा बजावलेल्या होत्या. त्याअनुषंगाने वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या प्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, विशेष नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून याआधी चार प्रकल्पांविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर आता उर्वरित पाच प्रकल्पांविरोधात गुन्हे दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Exit mobile version