| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह संपुर्ण तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने बैठका घेतल्या जात आहे. त्याच अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील खारेपाट परिसरात बैठका पार पडल्या. या बैठकांमधून कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद व उत्साह दिसून आला. त्यामुळे संपुर्ण अलिबाग तालुक्यात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांची बदला घेण्याची तयारी दिसून आली आहे. त्यामुळे या निवडणूकीत आपण घवघवीत यश संपादन करू, असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कावीर जिल्हा परिषद गटातील शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन धुमाळ व रामराज पंचायत समिती गणाचे उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.1) भोनंग येथे सभेचे आयोजनन करण्यात आले होते. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, अलिबाग तालुक्यात विकासाच्या नावाखाली लुट होत आहे. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी व अनेक प्रश्न या भागातील आहेत. मात्र, ते सोडविण्याऐवजी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम विरोधक करीत आहेत. हे कदापी शेकाप सहन करणार नाही. तळागाळातील घटकाला केंद्रबिंदू ठेवून आपण काम करतो. या भागातील विकास शेकापच्या माध्यमातून केला आहे. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यावर या गावांच्या विकासाचा अधिक कायापालट केला जाईल. येथील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न कायम राहिल. या भागात शेकापला मानणारा वर्ग आजही कायम आहे, असे देखील शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले. यावेळी कावीर जिल्हा परिषद गटातील उमेदवार मोहन धुमाळ, कावीर पंचायत समिती गणातील उमेदवार अनिल पाटील, रामराज पंचायत समिती गणातील उमेदवार अंजली पाटील, अशोक खोत आदींसह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व भोनंग येथील शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







