कार्यकर्त्यांचा विकासात मोलाचा सहभाग-शरद पवार

आजारी असतानाही शिर्डीतील शिबिराला उपस्थिती
। शिर्डी । प्रतिनिधी ।
पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केले आहे. पक्षाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहर्‍यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.
ते म्हणाले की, डॉक्टरांनी आपल्याला 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

या 15 दिवसानंतर नियमित कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचा लहान कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विकासात सहभाग आहे ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.

अजित पवार गैरहजर
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर आहेत. शुक्रवारी भाषणानंतर ते दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमाला आले नाहीत. वैयक्तिक कार्यक्रमामुळे ते शिबिराला आले नाहीत असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. रूग्णालयात उपचार घेत असलेले शरद पवार शिबीराला उपस्थित राहतात आणि अजित पवार यांचा असा कोणता कार्यक्रम होता, ज्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Exit mobile version