जिल्ह्यात ‘आमचे शौचालय, आमचा सन्मान’
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
जिल्ह्यात ‘आमचे शौचालय, आमचा सन्मान’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त दि. 14 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेनिमित्ताने ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता वापर व रंगरंगोटी करणार्या कुटुंबप्रमुख तसेच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्याचा जिल्हास्तरावर सन्मान करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर, दुरुस्ती व सुशोभिकरण करण्याच्या द़ृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्ताने विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. नादुरुस्त शौचालय वापरात आणावे, शिवाय पाण्यासाठी नळ जोडणी तसेच वीज जोडण्याची व्यवस्था करणे त्याचप्रमाणे दरवाजा कडीकोयंडा शिवाय फरशी, छत दुरुस्ती इत्यादी बाबींवर भर देऊन आपले शौचालय उत्कृष्ट करावे याकरिता ही जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे. दि.5 डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात अशाप्रकारे शौचालय याच्या निर्मितीसाठी विशेष गृह संपर्क व भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान नादुरुस्त शौचालय शोधून त्याची दुरुस्ती करण्याचे आवाहनदेखील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त गावातील या मोहीमेदरम्यान उत्कृष्ट निर्माण केलेल्या दोन कुटुंबांना ग्रामस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या दोन कुटुंबांची नावे पंचायत समितीमार्फत जिल्हास्तरावर सन्मानासाठी नामनिर्देशन करण्यासाठी पाठवणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व उत्कृष्ट शौचालयांपैकी 5 कुटुंबांची निवड जिल्हास्तरावरती होणार असून त्यांचा सन्मान जिल्हास्तरावर होणार आहे.
जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेले सर्व सार्वजनिक शौचालयाचीदेखील याच पध्दतीने दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम घेण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर याची पाहणी करुन तीन उत्कृष्ट शौचालयांची माहिती जिल्हास्तरावर प्राप्त होणार आहे. प्राप्त सर्व प्रस्तावांची व शौचालयाच्या पाहणीनंतर तीन सर्वोत्कृष्ट सार्व. शौचालयांचा निर्मितीकरिता परिश्रम घेतलेल्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्यांचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.या मोहिमेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर होण्याकरिता नागरिकांमध्ये गृहभेटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय साधता येणार आहे. त्यामुळे गावातील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या मदतीने स्वच्छता फेरी काढून सर्व शौचालय या मोहिमेदरम्यान वापरात राहतील याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी केले आहे.