200 कोटी खंडणी प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन ईडी समोर हजर

 नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस  अखेर 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आज अमलबजावणी संचलनालयासमोर हजर झाली. ईडीकडून तिची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर  मुख्य आरोपी आहे. सलग चार वेळा चौकशीला हजर होणं टाळल्यानंतर आज बुधवारी दुपारी तीन वाजता ईडीच्या दिल्ली कार्यालयात जॅकलीन हजर झाली.
पीएमएलए कायद्यातंर्गत जॅकलीनचे स्टेटमेंट नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जॅकलीनचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. सुकेश चंद्रशेखरचा जॅकलिनचा काही आर्थिक व्यवहार झाला होता का? या अंगाने ईडी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात आधी एकदा ईडीने जॅकलीनचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. मी सुद्धा पीडीत असून मी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं तिने पहिल्या चौकशीच्यावेळी सांगितलं होतं. काही व्यावसायिक कमिटमेंटमुळे चौकशीला हजर राहू शकणार नाही, असे आधी जॅकलिनने ईडीला कळवल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली चौकशी पुढे ढकलावी, अशी जॅकलिनने काल ईडीच्या अधिकार्‍यांना विनंती केली होती. पण अधिकार्‍यांना तिची तात्काळ चौकशी करायची होती.

Exit mobile version