अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरण; सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

| मुंबई । प्रतिनिधी।

2011 साली झालेल्या लैला खान आणि तिच्या कुटूंबाच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर निकाल राखून ठेवला होता, पण आता आठवड्याभराने निकाल जाहीर केला. प्रॉपर्टीच्या वादावरून परवेझने नोकराच्या मदतीने लैलाची आई, लैला आणि तिच्या संपूर्ण कुटूंबाची हत्या केली होती. परवेझ हा लैलाचा सावत्र वडील होता. लैलाच्या आईने त्याच्याशी तिसरं लग्न केल होते.

2011 साली परवेझ टाक याने लैला खान आणि तिच्या कुटूंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्महाउसमध्ये हत्या केली होती, आणि त्यांचे मृतदेह याच फार्महाऊसमध्ये गाडले होते. परवेझ हा लैलाच्या आईचा तिसरा नवरा होता आणि त्याचं वय त्यावेळी (29) वर्षं इतकं होते. लैलाचे पिता नादिरशाह पटेल यांनी लैला आणि तिच्या आईसोबत कुटूंबातील आणखी चार सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार ओशिवरा पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानंतर हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. परवेझने आपल्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला होता. हत्येनंतर काही महिन्यांनी परवेझला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. सुरुवातीला परवेझ लैला आणि तिचे कुटुंबीय दुबईत असल्याचं सांगत होता पण नंतर त्यानेच त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने राग परवेझच्या मनात होता. याशिवाय लैलाच्या आईचे तिचा दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीक वाढली होती. ही गोष्ट परवेझला पसंत नव्हती म्हणून त्याने हत्या केली असं आरोपपत्रात नमूद केले आहे. टाकने दिलेल्या जबानीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. 8 फेब्रुवारीला टाक लैलाच्या कुटूंबासहित इगतपुरी येथील फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. या दरम्यान मध्यरात्री लैलाची आई आणि टाकमध्ये भांडण झाले. हे भांडण सुरु असतानाच टाकने शेहलीना खानच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यामुळे शेहलीना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून घरातील इतर लोक जागे झाले आणि ते टाकला मारहाण करू लागले. तेव्हा टाकने मदतीसाठी चौकीदार असलेल्या शाकीर हुसेनला आवाज दिला आणि त्या दोघांनी मिळून संपूर्ण कुटूंबाची हत्या केल्याचे जबानीत कबूल केले. शेहलिना खान (59), त्यांची मोठी मुलगी अजमीना पटेल (32), दुसरी मुलगी लैला (30), जुळी मुलं झारा आणि इम्रान (25) आणि अजून एक नातेवाईक रेश्मा सगीर खान उर्फ टल्ली (19)यांची हत्या परवेझने केली होती आणि त्यांचे मृतदेह फार्महाऊसमध्ये गाडून टाकले होते.

Exit mobile version