चार हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा करता येणार नाही; 30 दिवसांची मर्यादा, साठेबाजांवर कडक कारवाई
| मुंबई | प्रतिनिधी |
साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजीला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोणत्याही साखर विक्रेत्याला चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा करता येणार नाही, तसेच प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखर साठवून ठेवता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दिले आहेत.
केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 आणि साखर (नियंत्रण) आदेश, 2025 अंतर्गत 28 जुलै रोजी साखरेच्या साठा मर्यादेबाबत अधिसूचना जारी केली. हा आदेश 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या नियमानुसार साखर विक्रेत्यांना कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही वेळी 4 हजार क्विंटलपेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही. तसेच साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा करता येणार नाही. विक्रेत्यांना साखरेच्या साठ्याची माहिती केंद्राच्या संबंधित संकेतस्थळावर जाहीर करून ती नियमित अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, साखरेच्या दरवाढीनंतर सोलापूर जिल्ह्यात पुरवठा विभागाने साठेबाजीविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात साखरेची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी विशेष पथकांकडून तपासणी केली जात आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, व्यापाऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त साठा करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.







