नेताजी सहकारी भातगिरणी चौकच्या अध्यक्षपदी अ‍ॅड परेश देशमुख


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सहकारी तत्वावर चालणार्‍या मोजक्यास अशा सहकारी भातगिरणींपैकी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या खालापूर तालुक्यातील चौक येथील नेताजी सहकारी भातगिरणी सोसायटी लि. चौकच्या अध्यक्षपदी अ‍ॅड परेश अनंतराव देशमुख तर उपाध्यक्षपदी शरीफ शेखअली भालदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्ह्यात सहकारी तत्वांवर सुरु असलेल्या दोन तीन मोजक्याच भातगिरणी आहेत. यात नेताजी सहकारी भातगिरणी सोसायटी लि. चौक ही भातगिरणी प्रतिष्ठेची समजली जाते. या भातगिरणीच्या समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सहायक निबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दि. वा. सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय लेखापाल अजय भारती हे उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड परेश अनंतराव देशमुख आणि उपाध्यक्षपदासाठी शरीफ शेखअली भालदार या दोघांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर करीत पिठासन अधिकारी दि. वा. सोनावणे यांनी निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच सदस्य म्हणून विनायक देशमुख, सुदाम कडपे, नथुराम कांगे, अनंता म्हात्रे, रघुनाथ फराट, अंकुश गायकवाड, भालचंद्र थोरवे, महिला प्रतिनिधी म्हणून अंजली देशमुख आणि अरुणा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
निवड जाहिर झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड परेश देशमुख म्हणाले की, भविष्यात भातगिरणीच्या उत्पन्नात वाढ करुन शेतकर्‍यांना चांगली सेवा देण्याचा आपण सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात गिरणीच्या नावलौकिकात वाढ होण्यासाठी कालानुरुप बदल करुन काम करु असेही त्यांनी सांगितले. यावेळी धनंजय देशमुख, जयवंत पाटील, जितेंद्र देशमुख, दळवी, अविनाश देशमुख, कोडीलकर, नयन देशमुख, विशाल देशमुख, भगवान देशमुख यांच्यासह ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते.

Exit mobile version