आदाडच्या प्रसिद्ध कलिंगडांचे मुरूड मार्केटमध्ये आगमन

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूडपासून दहा कि.मी. अंतरावर असणारे आदाड हे गाव 150 वर्षांपासून लालभडक आणि रसाळ, गोड कलिंगडांसाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्या सिझनमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुरूडच्या मार्केटमध्ये आदाडच्या कलिंगडाचे आगमन झाले आहे.
मुरूड मार्केटमध्ये ही कलिंगडे प्रथम विक्रीस आणण्याचा मान गावातील हरिश्‍चंद्र गुंड आणि वैशाली गुंड या दाम्पत्याने मिळविला आहे. आदाडची कलिंगडे लालभडक, अतिशय गोड आणि रुचकर आहेत. मार्केटमध्ये विक्रीस आणलेली कलिंगडे आयशा, मधुबाला बियाणातून पिकविण्यात आल्याची माहिती गुंड दाम्पत्याने बोलताना दिली. यांचे संयुक्त कुटुंब असून, कुटुंबात एकूण 14 लोक आहेत. सर्वजण शेती हा व्यवसाय करतात. दरवर्षी दोन एकर जमिनीवर कलिंगडाची शेती करतात. शिवाय भाजीपाला, मूग, वाल, चवळी, चणा आदी पिके घेतात. गुंड दाम्पत्य बैलगाडीने कलिंगडे मुरूड मार्केटमध्ये रोज विक्रीस आणतात. आकारमानानुसार 20 ते 150 रुपयांपर्यंत प्रत्येक कलिंगडास भाव मिळतो. या गावात 50 ते 60 शेतकरी कलिंगड शेती करतात. यामुळे कलिंगडाचे गाव आदाड त्याच नाव अशी ख्याती पसरलेली आहे. ही मंडळी बाहेरच्या साठे करी मंडळीना कलिंगडे विक्रीस न देता स्वतः विक्री करताना दिसतात.
कलिंगड शेतीसाठी सुफला, सम्राट, शेण आणि कुटी असे खत वापरले जाते. त्यामुळे कलिंगडे रसाळ, गोड आणि चविष्ट असतात. वाडवडिलांपासून परंपरेने आम्ही हा व्यवसाय संयुक्त पद्धतीने करीत असून, आमचा ब्रँड 150 ते 200 वर्षांपासून सर्वत्र प्रसिद्ध असून, त्याची चव कायम राखण्यासाठी आम्ही जमिनीची योग्य मशागत, मेहनत घेत असतो. त्यामुळे आमच्या येथील कलिंगडाची चव दीर्घकाळ जिभेवर टिकून राहते, अशी माहिती हरिश्‍चंद्र गुंड यांनी दिली.

Exit mobile version