महिलांना मिळतोय रोजगार
| मुरूड जंजिरा | वार्ताहार |
मुरूड मार्केटमध्ये ओले काजूगर आणि विविध गावठी भाज्यांची आवक वाढली असून सकाळी काजूगर आणि भाज्या मोठ्या प्रमाणात मुख्य मार्केट जवळ विक्रीस येत आहेत. गोपाळवट येथून ओले टपोरे काजूगर रु. 700/- ते 800/- किलो दराने उपलब्ध होत असले तरी मुरूड, रोहा तालुक्यातील मुचणे गावच्या आदिवासी महिला शेकडा रु. 120/- दराने ओले काजूगर विकताना दिसत आहेत. या महिला सुमारे 35 किमी एस टी बसने प्रवास करून दररोज मुरूड मार्केट मध्ये येत असतात. मुरूड तालुक्यातील पोपटीच्या कडव्या वालाच्या शेंगा देखील सकाळ संध्याकाळी मार्केट मध्ये येत आहेत. यामुळे अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे.
पोकळा, वांगी, मेथी, काळाभोपळा, पालक, भेंडी, दुधीभोपळा, गावठी कोथिंबीर, गावठी रताळी, पपई, वाल पापडी, घेवडा शेंगा, वालाच्या हिरव्यागार शेंगा, शेवगाच्या शेंगा, कलिंगडे, गावठी वेलची केळी, पडवळ आदी गावठी भाज्या देखील आदाड, खारआंबोली, शिघ्रे, तेलवडे, उंडरगाव, काकळघर, कोर्लई, जोसरांजन, शिघ्रे नविवाडी, केळघर, म्हसाडी, गोपळवट आदी गावांतून महिला मुबलक प्रमाणात विक्रीस आणत आहेत. शनिवार, रविवारी येणारे पर्यटक हिरव्यागार गावठी भाज्या घेण्यासाठी हमखास येतात. आदाड, शिघ्रे पंचक्रोशीतील लालभडक गोड चवीची कलिंगडे देखील मोठ्या प्रमाणांत विक्रीस येत आहेत. मुरूड तालुक्यातील कोर्लई गावातील प्रसिद्ध आणि चविष्ट वांगी देखील सकाळी विक्रीस येत आहेत. प्रसिध्द पोपटी साठी लागणाऱ्या कडव्या हिरव्यागार वालाच्या शेंगा रु- 100/- किलोने मिळत आहेत.