शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांची टीका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील झाडांची तोड पाहून डोळ्यांतून पाणी येतं. जैवविविधतेचा अनमोल खजिना असलेला सह्याद्री नष्ट करून या परिसराचे मसनवट्यात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी केला. पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी आणि विविध समविचारी संघटना वृक्षतोडीविरोधात एकवटल्या असून, शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
बाळाराम पाटील म्हणाले की, कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्प आणावेत, अशी सातत्याने मागणी होत आहे. मात्र, स्थानिक पर्यावरण, वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याऐवजी या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची भीती निर्माण झाली आहे. सह्याद्रीचा परिसर हा वन्यजीव, विविध पक्षी आणि दुर्मीळ वनस्पतींचा समृद्ध अधिवास आहे. या नैसर्गिक संपत्तीचे जतन करून पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधता आला असता. मात्र, त्याऐवजी जंगल उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पाच्या समर्थनार्थ रोजगारनिर्मितीचा मुद्दा मांडला जात असला, तरी प्रत्यक्षात स्थानिकांना किती रोजगार मिळणार, असा सवाल बाळाराम पाटील यांनी उपस्थित केला. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याऐवजी बाहेरील राज्यांतील कामगारांना प्राधान्य मिळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असेल, तर अशा विकासाच्या दिशेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या परिसरात घनदाट जंगल असून, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास वन्यप्राणी, पक्षी आणि संपूर्ण परिसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या जीवनमानावरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्षतोडीचा प्रश्न केवळ झाडांपुरता मर्यादित नसून, तो पर्यावरण, जैवविविधता आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित असल्याचे बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले.
वृक्षतोडीविरोधात शेकाप ठाम
या वृक्षतोडीविरोधात शेकापसह विविध समविचारी पक्ष, पक्षीप्रेमी, जंगलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र आले आहेत. रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून पर्यावरणप्रेमी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.आगामी काळात झाडांची तोड होऊ नये, ही आमची ठाम भूमिका आहे. सह्याद्रीचे जंगल आणि येथील जैवविविधता वाचवण्यासाठी शेकाप सक्रिय भूमिका बजावेल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या सर्वांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहील, असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.






