32 हजार कोटींचा घोटाळा; राहुल गांधींचा गंभीर आरोप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समूहाला लक्ष्य केले आहे. वीज महाग होण्यामागे अदानीच कारणीभूत असून त्यांनी 32 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी समूह इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात आणि भारतात दुप्पट दराने कोळसा विक्री करतात, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अदानी समूहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. देशातील नागरिकांनी वीजेचेबटण चालू करताच अदानींच्या तिजोरीत पैसे जमा होतात. अदानींना पंतप्रधान मोदी संरक्षण देत आहेत. जगातील इतर देशांमध्ये अदानींच्या व्यवहाराची चौकशी होत आहे. मात्र, भारतात अदानींना कोरा चेक दिला असल्याची टीका राहुल यांनी केली. त्यांना जे काही करायचे आहे ते करू देत, परंतु लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा असे आवाहन करताना पंतप्रधान मोदी अदानींची चौकशी का करत नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. प्रसारमाध्यमांवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून 12 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानीचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. अशा बातम्यांमुळे सरकार पडते. आम्ही कर्नाटक आणि राजस्थानमधील लोकांना सबसिडी देत आहोत तर अदानी किंमत वाढवत आहे. पंतप्रधान गप्प का? असा सवाल त्यांनी केला.