अदानींनी घेतली पवारांची भेट

| मुंबई | वृत्तसंस्था |

गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी गेले होते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली. ते अजून स्पष्ट झाले नसले, तरी या भेटीमुळे जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थिती गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गौतम अदानी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सुद्धा जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अदानी यांनी पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी यांनी शरद पवार आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सध्या देशात एअरपोर्ट बंदरापासून वेगवेगळ्या क्षेत्रात अदानी समूह वेगाने विस्तारत आहे. गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा निशाणा साधला आहे.

अदानी समूह धारावीचा पूनर्विकास करणार आहे. त्या विरोधात अलीकडेच ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढला होता. अदानी आणि शरद पवार भेटीमागे हे एक कारण असू शकते, अशीही चर्चा आहे.
हा त्यांचा प्रश्न आहे. हा विषय आमचा नाही. त्यांच्यात भेट झाली तेव्हा आम्ही काय खिडकीला कान लावून बसलो होतो का, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. भेट झाली पण यात महाविकास आघाडीचा संबंध काय. अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही, धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी-शर्ती आहेत, त्याला आमचा विरोध आहे. कोण-कोणाला भेटतय यावर महाविकास आघाडीचे भविष्य नाही. शरद पवार आणि अदानी यांचे फार जुने संबंध आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

मला काही माहिती नाही. पण, शरद पवार हे गुरुवारी अनेकांना भेटले आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version