अदर पुनावाला पुण्यात दाखल

। पुणे । प्रतिनिधी ।
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणार्‍या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान आता ते पुण्यात परतले असून हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशात करोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचं वातावरण असताना यादरम्यानच मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. अदर पूनावाला यांनी आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर परतणार असल्याचं सांगितलं होतं. सिरम लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

सिरम फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणली जाते. सिरम कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन करत असून आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सिरम केंद्र सरकारला जवळपास 50 कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.

पूनावाला यांनी नुकतंच ट्विट करत ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाल्याचं सांगितलं होतं. तसंच पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पाहन वेगाने सुरु असल्याची माहिती दिली होती. काही दिवसांत मी परतणार असून यावेळी कामाची पाहणी करण्यास उत्सुक आहे, असंही ते म्हणाले होते.

Exit mobile version