आदर्श पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

पुण्यातील पतसंस्था विलीनीकरणाचा निर्णय

| अलिबाग | प्रतिनिधी |

आदर्श नागरी सहकारी पथसंस्थेची 27वी वार्षिक सभा आदर्शचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.2) कुरूळ-अलिबाग येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉल येथे पार पडली. या सभेत कोथरूड-पुणे येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था आदर्श पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच, अनेक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आदर्श तर्फे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अलिबाग व जिल्हा पोलीस कल्याण निधीला प्रत्येकी 1 लाख रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले.

दरम्यान, नाना शंकर शेठ यांच्या पुण्यतिथि निमित्ताने संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे परितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत रेवस शाखाधिकारी कौस्तुभ म्हात्रे यांनी प्रथम, चेंढरे शाखाधिकारी रेश्मा पाटील यांनी द्वितीय, तर कुरुळ शाखाधिकारी प्रियांका जगताप-वाळंज व चोंढी शाखा सहशाखाधिकारी श्रीराज पावशे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. तसचे, संस्थेचे ज्येष्ठ सभासद सुभाष पानसकर यांनी वयाच्या 73व्या वर्षी 23 गडकिल्ल्यांची ट्रेकिंग केली. त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी संस्थेतर्फे बँकिंग व सहकाराचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मनोदय आपल्या मनोगतात व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सभासदांसमोर सादर केली. या सभेला कैलास जगे, अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, ॲड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, ॲड. रेश्मा पाटील, ॲड. वर्षा शेठ, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, संजय राऊत (सी.ए), डॉ.मकरंद आठवले आदी संचालक उपस्थित होते.

Exit mobile version