अध्यक्ष सुरेश पाटील यांचे प्रतिपादन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय एक हजार कोटींपर्यंत नेणार, असे प्रतिपादन आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आदर्शच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. यावेही सन 2021-22 या अहवाल सालासाठी संस्थेच्या भागधारकांना 11 टक्के लाभांश देण्याचे मंजूर करण्यात आले, असेही पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहात शनिवार, दि. 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी आदर्शचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था दि.1 ऑक्टोबर 22 पासून रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येतील, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, शाखा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात सभासदांना दिली.
सभेपूर्वी आदर्शच्या सभासदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा सहकार विकास अधिकारी आर.पी. ढवळे यांनी सभासदांना 97 वी घटना दुरुस्ती, सभासद हक्क, जबाबदारी, कर्तव्ये याबाबत मार्गर्शन केले. सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.उदय जोशी यांच्या हस्ते आदर्श पतसंस्थेच्या www.adarshapatsanstha.com या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. या वेबसाईटवर आता सभासदांना घरबसल्या संस्थेची आर्थिक माहिती, कर्ज, ठेव योजना, व्याजदर समजतील, असे प्रतिपादन सुरेश पाटील यांनी केले, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
या सभेकरिता सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली. याप्रसंगी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, विजय पटेल, अॅड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील, अभिजीत पाटील, संचालिका अॅड. रेश्मा पाटील, अॅड. वर्षा शेठ, तज्ज्ञ संचालक सुरेश गावंड, नागोठणे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र जैन, नागोठणे व्यापारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी वसंत तेरडे, आदर्शच्या मुख्य कार्यकारी आधिकारी मीनाक्षी शामसुंदर पाटील यावेळी उपस्थित होत्या.