‌‘अभियांत्रिकी‌’ला एआयची जोड द्या: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा

| माणगाव | प्रतिनिधी |

भारताच्या विकसित राष्ट्राच्या वाटचालीत महानगरांसोबतच गावांचा आणि ग्रामीण भागाचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समाजाच्या समस्या सोडविणारे अभियंते बनावे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण उपजीविकेतील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या 28 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजना मंत्री तथा पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलगुरू प्रा. राजनिश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामुणकर आदी उपस्थित होते.

पदवी ही केवळ शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसून समाजासाठी योगदान देण्याची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील आणि परिसरातील समस्या ओळखून तंत्रज्ञानाधारित उपाय शोधावेत. डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ घेत कल्पनांचे कृतीत रूपांतर करावे, असे त्यांनी आवाहन केले.

पालकमंत्री भरत गोगावले यांनी विद्यापीठासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठातील उपलब्ध जागा व सुविधांचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन केले. कुलगुरू प्रा. राजनिश कामत यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‌‘डॉक्टर ऑफ सायन्स‌’ ही मानद पदवी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

विद्यापीठाचा निकालांचा ‌‘बॅकलॉग‌’ दूर करणार : चंद्रकांत पाटील
विद्यापीठातील परीक्षांच्या निकालांना झालेला विलंब मोठ्या प्रमाणात दूर केला असून, उर्वरित कामही लवकर पूर्ण करण्यात येईल. यापुढे निकालानंतर तात्काळ पदवी प्रमाणपत्र तयार करून ‌‘डिजी लॉकर‌’मध्ये उपलब्ध करून दिले जाईल. विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक व अन्य पदे पुढील तीन महिन्यांत भरण्यात येतील, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. इनक्युबेशन सेंटरला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Exit mobile version