पेणमध्ये शिक्षक संवाद
| पेण | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदारांना एकत्र करून शिक्षकांची व्यथा काय आहेत हे वेळोवेळी विधी मंडळात आक्रमकपणे मांडली. त्यामुळेच शासनाने त्याची दखल घेउन विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्यास भाग पडले, असे प्रतिपादन आ.बाळाराम पाटील यांनी पेण येथे केले. कोकण विभाग शिक्षण मतदार संघाची निवडणूक येत्या 30 जानेवारीला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथील माध्यमिक शिक्षण पतपेढी येथे शिक्षक संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी जि.प. सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे (हरिओम), राष्ट्रवादीचे दयानंद भगत, उदय जवके, नरेश ठाकुर, शिवसेनेचे नरेश गावंड, जगदीश ठाकुर, काँग्रेसचे अशोक मोकल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, गेल्या 6 वर्षात शिक्षकांसाठी जे मला करायच होत ते ते मी केले आहे. मी माझा पेपर लिहून ठेवला आहे. तो तपासणे आता मतदार शिक्षकांच्या हातात आहे. गुण किती द्यायचे आहेत हे तुम्ही ठरवा. मात्र एवढे नक्की, गेल्या 6 वर्षात केलेले काम पाहता मी पास होण्याएवढे मार्क आपण द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्या वेळेला आम्ही सर्व शिक्षक आमदारांनी पुणे भिडेवाडा ते मंत्रालय पायी चालत जाण्याचा विचार केला त्यावेळेला भिडेवाडा ते खालापूर (नढाळ) पर्यंत पोहचल्यावर शासनाला आमची दखल घ्यावी लागली आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा लागला. आमच्या ज्या मागण्या होत्या त्या शिक्षक हिताच्या होत्या, असा दावाही बाळाराम पाटील यांनी केला. या हिवाळी अधिवेशनात आम्हाला दिलेला शब्द शासनाला पाळावा लागला आणि विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न निकाली निघाला, असेही त्यांनी सुचित केले.
मी माझ्या आमदारकीच्या काळात कोकणातील जवळपास शाळांना प्रिंटर्रसह शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले. माझा निधी ही तुटपुंजा होता, त्यासाठी मी आमदार व खासदारांची मदत घेतली आणि त्यांनी देखील मला आपल्या हिस्याची निधी दिली. त्यामुळेच मी सर्व शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक साहित्य पुरवू शकलो. ज्या काही शैक्षणिक संस्थांना साहित्य मिळाले नाही त्यांना मी आमदार असो वा नसो साहित्य मिळणारच असेही त्यांनी आश्वासित केले.
यावेळी धैर्यशील पाटील, अशोक मोकल, दयानंद भगत आणि नरेश गावंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मोठया प्रमाणात पेण तालुक्यातील शिक्षक वर्ग उपस्थित होते.
दळवींच्या हस्तकाला हुसकावले
पेण येथे शिक्षक संवाद मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांचे निकटवर्तीय असलेले सुरेश कोळी हे येऊन बसले होते. ही बाब उपजिल्हा प्रमुख ठाकरे गट नरेश गावंड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की, शिंदे गटाच्या कार्यकर्त्याना आपण बोलावणे केले आहे का? त्यावर असे समजले की, शिंदे गटाची ही व्यक्ती कार्यक्रमाचा कानोसा घ्यायला आली आहे. त्यावर नरेश गावंड यांनी त्या व्यक्तीला हुसकावून लावण्यास सांगितले.