आदिल गजगेची रायगड प्रीमियर लीगसाठी निवड

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील आझाद क्रिकेट क्लबचा सदस्य आक्रमक शैलीचा फलंदाज आदिल युनूस गजगे यांची रायगड जिल्हा प्रीमियर क्रिकेट लीगसाठी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आदिल गजगे बरोबरच माणगावमधील उतेखोल गावातील अष्टपैलू खेळाडू शुभम जाधव व कचेरी रोड मार्गावरील वंदना अपार्टमेन्ट येथील रहिवासी द्रुतगती गोलंदाज ऋषभ भोनकर यांची रायगड प्रीमियर लीगसाठी निवड झाल्याने त्यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायगड प्रीमियर लीगसाठी जिल्ह्यातील 32 नामवंत संघातून 2790 क्रिकेट खेळाडूंनी आपले ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यातून प्रत्येक संघातून 14 खेळाडू असे एकूण 448 खेळाडूंची रायगड प्रीमियर लीगसाठी निवड करण्यात आली.त्यामध्ये माणगावमधील आदिल गजगे,शुभम जाधव,ऋषभ भोनकर यांची निवड करण्यात आली.हे 32 संघ 4 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पनवेल येथे होणार्‍या स्पर्धेत उतरून आपला कसब दाखविणार आहेत.आदिल गजगे व ऋषभ भोनकर हे अफजल 11 श्रीवर्धन या संघातून खेळणार असून या संघाचे संघमालक अफजल मेमन व कर्णधार महाडचा आक्रमक शैलीचा फलंदाज व अष्टपैलू खेळाडू योगेश पेणकर आहे.तर माणगावचा अष्टपैलू खेळाडू शुभम जाधव हा विचुंबे तालुका खालापूर या संघातून खेळणार आहे.या प्रीमियर लीगसाठी 32 संघांचे नामवंत असे संघमालक आहेत.माणगाव येथील आक्रमक शैलीचा फलंदाज आदिल गजगे यांनी लहान वयातच क्रिकेटचे धडे गिरवून गावपातळीवरील मैदानावर सुरुवातीला आपली छाप पाडली.हळूहळू त्याने माणगावसह रायगड जिल्ह्यातील नामवंत संघांतून खेळताना फलंदाजीतून आपली आक्रमकता दाखवून त्याने जिल्ह्यातील अनेक मैदाने गाजवून आपल्या संघांना एकहाती सामने जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.आदिल गजगे यांच्यासह शुभम जाधव,ऋषभ भोनकर यांची रायगड जिल्हा प्रीमियर लीगसाठी निवड झाल्याने जुने माणगाव मस्जिद मोहल्ला ग्रामस्थांसहित,तालुक्यातील मान्यवर,मित्रपरिवार यांनी त्यांचे खास अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version