शेवटच्या दिवशी पर्यटन विकास निधीवर डल्ला

अदिती तटकरे यांनी मतदारसंघात दिला सर्व निधी
फक्त तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यातील पर्यटन विकास
रु.20 कोटी 37 लक्ष निधीस प्रशासकीय मंजूरी तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सत्तांतर होऊन आपले मंत्री पद जाण्याआधीच शेवटच्या दिवशी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यांना उपेक्षित ठेवून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचा निधी आपल्या मतदारसंघातील तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यात देण्याचा पराक्रम केला आहे. यातील 20 कोटी 37 लक्ष निधीस प्रशासकीय मंजूरी तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत देखील करण्यात आला आहे.

राज्यातील सत्ता अस्थिर असतानाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचा खटाटोप जिल्ह्यातील इतर आमदारांनी यशस्वी होऊ न दिल्याने पालकमंत्री अदिती तटकरे अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्याच दिवशी विकास कामांच्या आढावाखाली बैठक आयोजित केली होती. त्यानंतर अखरेच्या दिवशी 29 जून रोजी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचा तब्बल 20 कोटी 37 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत देखील केला. मात्र हा निधी जिल्ह्यातील इतर कुठल्याही भागात न देता फक्त आपल्याच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या तालुक्यातच देऊ केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून हा तसेच शेवटच्या टप्प्यातील घेण्यात आलेले सर्व निर्णय तपासून रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मंजुरी दिलेल्या निधीची माहिती पुढीलप्रमाणे, कुडा लेणी, ता.तळा येथील पर्यटन मूलभूत सोयीसुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख), देवकुंड, ता.माणगाव येथे पर्यटन सुविधा निर्माण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.2 कोटी, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख), श्रीवर्धन समुद्र किनारी अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधित बंधार्‍याचे सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.60 हजार), श्रीवर्धन शहरातील विविध ठिकाणी सुशोभीकरण पॉईंटची निर्मिती करणे (प्रशासकीय मान्यता – रु.25 लाख, वितरीत रक्कम – रु.25 लाख), श्रीवर्धन नगरपरिषदेचे पर्यटक निवास इमारतीचे नूतनीकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.12 लाख 75 हजार, वितरीत रक्कम – रु.12 लाख 75 हजार), श्रीवर्धन मुख्य कमानी पासून समुद्रकिनार्‍याकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.74 लाख 42 हजार, वितरीत रक्कम – रु.52 लाख), श्रीवर्धन येथील भुवनाळे तलावाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.49 लाख 96 हजार, वितरीत रक्कम – रु.49 लाख 96 हजार), श्रीवर्धन येथील जिवनेश्‍वर कुंडाचे नूतनीकरण व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.49 लाख 9 हजार, वितरीत रक्कम – रु.49 लाख 9 हजार), म्हसळा नगरपंचायत हद्दीत धार्मिक व सार्वजनिक स्थळे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे (प्रशासकीय मान्यता – रु.1 कोटी 64 लाख 91 हजार, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 15 लाख), म्हसळा तालुक्यातील जासई नदीकिनारा विकसित व सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.5 कोटी, वितरीत रक्कम – रु.4 कोटी), दिवेआगार येथे केदारलिंग भैरव मंदिर सभा मंडप बांधणे (प्रशासकीय मान्यता – रु.69 लाख 36 हजार, वितरीत रक्कम – रु.69 लाख 36 हजार), दिवेआगार येथे सिद्धनाथ भैरव मंदिर सभा मंडप बांधणे (प्रशासकीय मान्यता – रु.69 लाख 36 हजार, वितरीत रक्कम – रु.69 लाख 36 हजार), देवखोल येथील कुसुमेश्‍वर मंदीर परिसर विकास करणे (प्रशासकीय मान्यता – रु.1 कोटी, वितरीत रक्कम – रु.70 लाख), रोहा नगरपरिषद हद्दीतील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पातील शिवसृष्टी परिसर सुशोभिकरण करणे (प्रशासकीय मान्यता – रु.1 कोटी 78 लाख, वितरीत रक्कम – रु.1 कोटी 50 लाख), रोहा येथील शिवसृष्टीच्या परिसरात आरामदायी आणि गोल शिल्प तयार करणे (प्रशासकीय मान्यता – रु.2 कोटी 45 लाख, वितरीत रक्कम – रु.2 कोटी). अशा प्रकारे एकूण 20 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांच्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनासंबंधीत विविध विकासकामांना शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि त्यापैकी 16 कोटी 22 लाख 52 हजार रक्कमेचे वितरण आदेशही देण्यात आले आहेत.

Exit mobile version