पालकमंत्रीपद मिळालेच तर आनंदच- अदिती तटकरे

| पाली | प्रतिनिधी |

पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात मला नाराजीचे वातावरण वाटत नाही. ते मिळाले तर आनंदच असल्याची सुचक प्रतिक्रिया महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी पाली येथे व्यक्त केली.

मंत्री झाल्यावर प्रथमच पालीच्या दौऱ्यावर आलेल्या अदिती तटकरेंशी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्रीपदावरुन निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाविषयी विचारणा अदिती तटकरे यांना केली असता त्यांनी सांगितले की, हा जो निर्णय आहे तो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या वरिष्ठांच्या पातळीवरील हा निर्णय आहे. दिले तर आनंदच असल्याचे सुचक वक्तव्यही करण्यास त्या विसरल्या नाहीत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटाने दावा केला आहे. आ.भरत गोगावले यांनी तर मी पालकमंत्री होणार असल्याचा दावा वारंवार केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अदिती तटकरेंनी केलेल्या विधानाने त्यास अनेक अर्थ प्राप्त होत आहेत.

राज्यात तीन पक्षांचे हे सरकार आहे. सर्व वरिष्ठ मंत्री हे सर्व कामांवर लक्ष केंद्रीत करून काम करणारी मंडळी आहे. आम्ही सर्व विकासात्मक बाबींनाच प्राधान्य देणार आहोत आणि पालकमंत्री पदाचा जो निर्णय वरिष्ठ घेतील तो निर्णय जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्यच असेल अशी माझी खात्री या जिल्ह्याची नागरिक म्हणून मला आहे. रायगड जिल्ह्यातील आम्ही सर्व रायगडचा विकास हा सकारात्मक विचार मनात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये काम करू याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे देखील यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Exit mobile version