‘आदित्‍य एल-1’ची सूर्याकडे यशस्वी झेप

। श्रीहरीकोटा । वृत्तसंस्था ।

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya-L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.

पाच टप्प्यांमध्ये प्रवास
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
'आदित्य एल-1' असा करणार सूर्याचा अभ्यास
आदित्य एल-1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल.
Exit mobile version