आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
। नागपुर । प्रतिनिधी ।
महायुती सरकारने ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळली आहे. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नाही. योजनेत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावरुन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारने या योजनेतंर्गत राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम दिले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता फडणवीस सरकारने ही योजना गुंडाळली आहे. तसेच, एक राज्य एक गणवेश योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. राज्य सरकारने आता ती योजना बंद केली आहे. या खात्याचे संबंधित मंत्री केसरकर यांनी त्यात मलई खाल्ली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यांना मंत्रीमंडळातून दूर ठेवले म्हणजे ते स्वच्छ झाले, असे होत नाही. या योजनते अनियमितता कशामुळे, यात नेमका किती भ्रष्टाचार झाला आहे, याची माहिती जनतेला मिळायलाच हवी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.