। मुंबई । प्रतिनिधी ।
गेली वर्षभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण होऊन आता निकालाला काहीच तास बाकी राहिलेले आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. मात्र बहुमत असल्याने सरकारला कोणताही धोका नसल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येतंय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा वरळीचे आ. आदित्य ठाकरे राजभवनावर दाखल झाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत उभयतांमध्ये नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली होती.
गतवर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 40 आमदारांनी गद्दारी करीत एकनाथ शिंदे यांना साथ दिली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांच्या बहुमत चाचणीचा आदेश वैध की अवैध, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र अशा सगळ्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणी झाली.
गेली साडे आठ महिने याविषयीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु होती. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतले. घटनापीठातील एक न्यायमुर्ती 15 मे रोजी निवृत्त होत असल्याने पुढच्या दोन दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली आहे. तत्पूर्वी आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासांहून अधिक काळ चर्चा झाली. चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी आमदार अपात्रतेच्या आणि सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.
सुनावणी अंतिम टप्प्यात असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्ताधार्यांना अनेक अडचणीचे सवाल विचारुन कोंडी केली होती. दोन्ही गटाकडून यादरम्यानचे युक्तिवादही तगडे झाले होते. असं सगळं असताना महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार की परवा लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.