| हमरापूर | वार्ताहर |
पेण तालुक्यातील वाशी व शिर्की खारेपाटात पिण्याच्या पाण्याचे संकट पुन्हा एकदा उभे राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वाशी व शिर्की खारेपाटात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनामार्फत टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो कमी पडत आहे. नळाला नियमितपणे पाणी येत नाही. त्याचा मोठा फटका लग्न समारंभावर जाणवत असल्याने जनता हैराण झाली आहे.
शिर्की भागातील कोळवे, शिंगणवट, बेणेघाट, मसदबेडी मसद, सागरवाडी, दरबारवाडी, उफाडावाडी, बोरी, शिर्की, शिंगणवट, बेणेघाट तसेच वाशी भागांतील भाल, विठ्ठलवाडी, तुकाराम वाडी, दामोदर वाडी, मंञीबेडी, बहीरामकोटक, तामसीबंदर, लाखोले, मोठेभाल, विठ्ठलवाडी, कान्होबा, बेनवले, नारवेल, ठाकुरबेडी, कणे, बोर्झे, पैरणकरवाडी या व अन्य वाड्या तसेच हमरापूर विभागातील ऊर्णोली व इतर गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिना संपला तोच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. गेली कित्येक वर्षे या पाण्याच्या दुष्काळाच्या सावटात खारेपाटातील जनता व महिला भगिनी आपले जीवन जगत आहेत.
पावसाळ्यात चार महिने वाशी व शिर्की खारेपाटातील ग्राामस्थ घराच्या छतावर पडणारे पागोळीचे पााणी भाड्यांमध्ये साठवूून पिण्यासाठी वापरतात. गेेली 40 वर्षे हेच सुरु आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो, परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही कोणत्याही आमदार, मंंत्री किंवा जिल्हा प्रशासन यांना सोडवता आलेला नाही, ही खरोखरच या भागातील जनतेची शोकांतिका म्हणावी लागेल. यावर्षीदेखील पेण पंचायत समितीने वाशी व शिर्की खारेपाट भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली आहे.
विकत आणावे लागते पाणी
सध्या लग्नसराई सुरु असल्याने पाणी अधिक लागत आहे. वाशी खारेपाट भागाला नळाने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र पश्चिमेकडे असणाऱ्या सरेभाग, कान्होबा, दामोदरवाडी, तुकारामवाडी, भाल, विठ्ठलवाडी, जनवली, बेनवले, ठाकूरबेडी व इतर वाड्यातील जनतेपर्यंत नळाचे पाणीच पोहोचत नाही. तर जिल्हा परिषदेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पाणी पडत असून, दोन दिवस आड टँकरने पाणी येत आहे. त्यामुळे जनतेला विशेषतः लग्न असणाऱ्या वऱ्हाडी मंडळीना पेण परिसरातून टेम्पोने ड्रममधून विकत पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाशी व शिर्की खारेपाटातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या शिर्की गावासह 22 बेडी, वाशी खारेपाट भागातील 14 बेडी व खारपाडा हद्दीतील वडमाळवाडी, खैरासवाडी जावळी हद्दीतील निफाडवाडी, दोरेवाडी, खरबाचीवाडी, खरोशी कोयना मायनीवाडी तसेच पाबळ जवळील कुरनाड बौध्दवाडी याठिकाणी एकूण 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
संजय कांबळे, पाणीपुरवठा अधिकारी, पेण पंचायत समिती