बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील डोंगराळ भागात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बॉक्साईट उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून, आगामी पावसाळ्यात मोठ्या भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, डोंगरांची अनियंत्रित लचकेतोड सुरू असून, यामुळे इरशाळवाडी किंवा तळीयेसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोकलन आणि जेसीबीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी डोंगरांचे उतार धोकादायक पद्धतीने कापले जात आहेत. भूगर्भशास्त्र आणि खनिकर्म विभागाच्या नियमांनुसार आवश्यक असलेले सुरक्षित उतार आणि पायऱ्यांची रचना न ठेवता थेट उभे कडे तयार करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याशिवाय उत्खननासाठी होत असलेल्या स्फोटांमुळे डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्यात या भेगांमध्ये पाणी मुरल्यास डोंगरकडे कोसळून पायथ्याशी असलेल्या वाड्या-वस्त्यांवर संकट ओढवू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, डोळ्यांसमोर डोंगर पोखरले जात असतानाही महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा प्रभावी कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. इरशाळवाडीसारख्या दुर्घटनेनंतर मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, आजही परिस्थिती बदललेली दिसत नसल्याने खाणमाफियांच्या वाढत्या प्रभावापुढे प्रशासन हतबल झाले आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दुर्घटना घडल्यानंतर शोक व्यक्त करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आताच कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






