महामार्गाची पाहणी एसी गाडीतून नको, एकदा लाल परीतून करा; गणेशोत्सवापूर्वी प्रवास अनुभवण्याची मागणी
|पेण |प्रतिनिधी |
गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहण्यांचा, बैठकींचा आणि घोषणांचा सिलसिला सुरू होतो. मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महामार्गाची पाहणी करतात, विकासाच्या गप्पा रंगतात, आश्वासनांची खैरात होते; मात्र महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या नशिबी आजही खड्डे, वाहतूक कोंडी, धोकादायक वळणे आणि जीवघेणा प्रवासच येत असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर एक अनोखी पण वास्तववादी मागणी पुढे आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करणाऱ्या सर्व मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी किमान एकदा तरी महाराष्ट्र शासनाच्या लालपरीने (एसटी बस) या मार्गावर प्रवास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वातानुकूलित आलिशान वाहनांच्या बंद काचांमधून महामार्गाचे वास्तव दिसत नाही. रस्त्यावरील प्रत्येक खड्डा, प्रत्येक धक्का, तासन्तास सुरू असलेली वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते आणि नागरिकांचा रोजचा संघर्ष याची खरी जाणीव फक्त एसटी बसमधून प्रवास केल्यावरच होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या पाहण्या होतात, बैठका घेतल्या जातात आणि कामे लवकर पूर्ण करण्याची आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी केवळ पाहण्या आणि घोषणांपुरते मर्यादित न राहता, लोकप्रतिनिधींनी सामान्य नागरिकांसोबत एसटीने प्रवास करून वास्तव अनुभवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी केवळ कागदोपत्री आढावे नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
एसी गाडीतून महामार्ग चांगलाच वाटतो; पण लाल परीत बसल्यावरच खड्ड्यांची भाषा समजते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असून, ही मागणी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कितपत गांभीर्याने घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.







