नागोठणे पोलिसांनी केला पर्दाफाश; 6 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पतीकडूनच जप्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
आर्थिक अडचणीमुळे पत्नीचे सोन्याचे दागिने स्वतःच लपवून ठेवायचे आणि नंतर घरफोडी झाल्याचा बनाव करून पोलिसांत तक्रार द्यायची; मात्र पतीचाच हा डाव नागोठणे पोलिसांनी उधळून लावला. आंबेराई-बेनसे येथील दिपक रामचंद्र भुरे याने स्वतःच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. तपासात त्यानेच दागिने लपवून घरफोडीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याकडून 6 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
5 सप्टेंबर रोजी दिपक भुरे याने नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 4 सप्टेंबरच्या रात्री तो आणि त्याची आई कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर बेडरूममधील कपडे अस्ताव्यस्त, कपाटे व ड्रॉव्हर उघडे तसेच बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढलेल्या आणि पोटमाळ्यावरील खिडकी तोडलेली आढळल्याचे त्याने सांगितले होते. पत्नीने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार त्याने केली होती. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहाय्यक फौजदार संदेश सानप तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील व त्यांचे पथक तसेच नागोठणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यात घरफोडीचा बनाव करून दागिने स्वतःच लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या मुद्देमालात 12 तोळ्यांची सोन्याची गंठण, दोन तोळ्यांचा सर, दोन तोळ्यांची चैन, तीन तोळ्यांची चैन आणि तीन तोळ्यांचा हार अशा एकूण 6 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, रोहाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी सपोनि रवींद्र पारखे, पोउनि सूरज पाटील यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. प्रवासाला जाताना घरात दागिने किंवा मोठी रोकड ठेवू नये. मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात, बाहेरगावी जाताना विश्वासू शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा 112 हेल्पलाईनवर संपर्क साधावा. घरातील नोकर, चालक, सुरक्षा रक्षक व भाडेकरू यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन नागोठणे पोलिसांनी केले आहे.







