दोनशे कंपन्यांची अपेक्षा; आतापर्यंत अवघ्या 74 कंपन्यांची नोंदणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी रोजगार महाकुंभाचे आयोजन केले असताना कंपन्यांकडून मात्र अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (दि. 29) जिल्ह्यात 12 ठिकाणी होणाऱ्या या मेळाव्यासाठी सुमारे 200 कंपन्यांची नोंदणी अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ 74 कंपन्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे कंपन्यांचा सहभाग वाढणार का, याकडे लक्ष लागले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 914 बेरोजगारांनी नोंदणी केली असून, 1 हजार 681 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पनवेलमध्ये चार, माणगाव, सुधागड, कर्जत, पेण, खालापूर व अलिबाग येथे प्रत्येकी एक आणि रोहा येथे दोन अशा एकूण 12 ठिकाणी मेळावे होणार आहेत. मेळाव्यात मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत पहिल्या टप्प्यात 1 हजार 814 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत, प्रभावी स्व-परिचय, निवड प्रक्रियेची तयारी आणि संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची तयारीही सुरू आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाने अनेक कंपन्यांशी थेट संपर्क साधून सहभागाचे आवाहन केले आहे. मात्र मेळावा तोंडावर आला असतानाही 200 कंपन्यांच्या अपेक्षेच्या तुलनेत केवळ 74 कंपन्यांची नोंदणी झाली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जास्तीत जास्त कंपन्यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. आता या आवाहनाला कंपन्या किती प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.






