ताळेबंदातील फरकासह पाच कोटींच्या थकबाकीचा आरोप; सभासदांचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिक्षकांच्या पतपेढीच्या कारभारातच ताळेबंदाचा फरक आणि तब्बल पाच कोटींची थकबाकी असल्याच्या आरोपांनी अलिबागमधील प्राथमिक शिक्षक पतपेढी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातच लेखापरीक्षणासाठी आकारली जाणारी फी अवास्तव असल्याचा आरोप सभासदांनी केल्याने पतपेढीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्द्यावरून सभासद मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र, संचालक मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सभासद दीपक पाटील, निलेश तुरे आणि प्रसाद म्हात्रे यांनी पतपेढीच्या कारभाराबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या निवेदनानुसार, 2018-19 ते 2024-25 या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात ताळेबंदात फरक आढळून आला आहे. तसेच पतपेढीत सुमारे पाच कोटी रुपयांची थकबाकी असून, नोकरदारांच्या पगारावर चालणाऱ्या पतसंस्थेसाठी एवढी थकबाकी गंभीर असल्याचा दावा करण्यात आला आहे. लेखापरीक्षणासाठी आकारली जाणारी फीसुद्धा अवास्तव असल्याचा आरोप करण्यात आला असून, 29 ऑक्टोबर 2014च्या शासन निर्णयानुसार फी आकारण्याची मागणी सभासदांनी केली आहे. विविध त्रुटी निदर्शनास आणूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सभासदांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पतपेढीच्या संचालक मंडळाने लेखी आश्वासन दिले आहे. ताळेबंदातील जुना हस्तलिखित फरक 29 डिसेंबर 2026पूर्वी शोधून तफावत रक्कम जिल्हा विशेष लेखापरीक्षण सहकारी संस्था आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केली जाईल, असे पतपेढीने स्पष्ट केले आहे.
तफावत रकमेस जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तसेच 27 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थकबाकी वसुलीसंदर्भात कठोर कारवाईचा ठराव घेण्यात येणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार 2025-26 या आर्थिक वर्षाची लेखापरीक्षण फी देण्यात येईल, तसेच शासनाने फीबाबत सुधारणा केल्यास त्याचे पालन केले जाईल, असेही संचालक मंडळाने लेखी कळविले आहे. दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा करून सभासद आणि संचालक मंडळातील सदस्यांची समिती गठीत करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवारचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.





