। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर बोगस असे करावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. भाजपच्या युतीने दिलेल्या एकाही आश्वासनाचा अर्थसंकल्पात समावेश केलेला नसून जनेतेने नव्हे तर निवडणूक आयोगाने निवडलेल्या सरकारच्या निस्तेज मूडला सामावून घेणारा निस्तेज अर्थसंकल्प, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आले हे भाजपला माहीत असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. लाडक्या बहिणीला दिलेले 2100 रुपयांचे आश्वासनही पूर्ण केलेले नाही.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत दाखवलेली 64 हजार कोटींची कामे नवीन नाहीत, त्यापैकी बरीचशी कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतेक कामांना उशीर झाल्याने खर्च वाढला आहे. त्यामुळेच हा खर्च या आकड्यात दाखवला आहे. तसेच, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केल्यानंतर अद्यापपर्यंत अरबी समुद्रात उभारल्या न गेलेल्या शिवस्मारकाचाही उल्लेख नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.