आदिवासी, दिव्यांग ‌‘अंत्योदय’पासून वंचित

तर धनदांडगे मात्र लाभार्थी?

| सुधागड-पाली | वार्ताहर |

ज्या कुटुंबाचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदारनिर्वाहाचे साधन नाही अशांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सुधागड तालुक्यात आदिवासी, दिव्यांग व्यक्ती अंत्योदय शिधापत्रिका योजनेपासून वंचित असून, धनदांडगे मात्र या योजनेचा लाभ घेत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सुधागड तालुका हा आदिवासीबहुल व डोंगराळ भाग असून, येथे रोजगाराची वानवा आहे. अंत्योदय शिधापत्रिकेवर 25 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 1 लीटर रॉकेल व 1 किलो साखर मिळते. या योजनेमुळे त्यांचा अन्नसुरक्षेचा प्रश्न मिटतो. दहा-पंधरा वर्षांपूर्वी स्थानिक राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला व यावेळी लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेतली नसल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. सद्यःस्थितीत ‌‘इष्टांक नाही’ असे कारण देऊन, पुरवठा विभाग आदिवासींना वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. जीर्ण शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या बदलून देणे, ही पुरवठा विभागाची जबाबदारी आहे. परंतु, असा कोणताही शोध पुरवठा विभाग घेत नसल्याचे दिसते. अंत्योदयचे धनदांडगे लाभार्थी, जीर्ण शिधापत्रिका बदलत नसून, त्यांना धान्याचा मोह सुटत नाही. पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण शिधापत्रिका शोधून त्या बदलून देण्याची मोहीम राबविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या मोहिमेमुळे बरेचसे ‌‘अंत्योदय’चे लाभार्थी कमी होतील व इष्टांक उपलब्ध होऊन त्याचा लाभ आदिवासी व दिव्यांगांना होईल.

ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे बरेच लाभार्थी ‌‘अंत्योदय’ योजनेचा लाभ घेत आहेत. लाभार्थ्याची आर्थिक परिस्थिती बघून लाभार्थ्याला शिधापत्रिका देणे अपेक्षित आहे, परंतु असे झालेले दिसत नाही. पुरवठा विभागाने शोधमोहीम घेऊन जीर्ण शिधापत्रिका बदलून दिल्यास आदिवासी, दिव्यांग बांधवांना इष्टांक उपलब्ध होईल.

मंगेश यादव, सामाजिक कार्यकर्ता
Exit mobile version