| पनवेल | प्रतिनिधी |
जमीन आमच्या हक्काची… नाही कुणाच्या बापाची… सिडको प्रशासन हाय हाय… अशा घोषणाबाजी करत पनवेल तालुक्यातील वळीवली गावातील आदिवासी बांधवाणी रस्त्यावर उतरून आज सिडको प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जमिनी मिळवण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढून मंत्रालयाकडे कूच केली. आदिवासी बांधवांनी खांदा कॉलनी येथून पायी मोर्चा काढला. सुमारे 200 कुटूंब मोर्चात सहभागी झाली होती. गेली 50 वर्षाहुन अधिक वर्ष वळवली गावात राहणारे आदिवासी कुटूंब वळवली येथील शेत जमिनी कसून आपला उदरनिर्वाह करत आहे. आता सिडकोने या आदिवासी जमिनीवर आपला मालकी हक्क सांगून आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न सिडकोने केला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जमिनी परत द्याव्या अशी मागणी केली आहे.
सिडकोने या जमिनीवर मालकी हक्क सांगितल्याची माहिती मिळाल्यानंतर, आदिवासी बांधवांनी अनेक पत्रव्यवहार करून या जमिनी परत करा अशी मागणी शासनाकडे केली होती. या पत्रव्यवहारानंतर महसूल विभागाने जमीनी परत देण्याचे फर्मान देखील सिडको प्रशासनाला दिले होते. सिडको प्रशासनाने या जमिनीवर मालकी हक्क सांगून आपला हक्क प्रस्थापित केला आहे. संतापलेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून या जमिनी परत करण्याची मागणी केली आहे.
आदिवासी बेघर
वळवली येथील आदिवासी बांधव कसत असलेल्या जमिनीवर आत्ता सिडकोने आपला मालकी हक्क सांगितला आहे. येथील आदिवासी बांधव अनेक वर्षापासून या परिसरातील जमिनी कसून आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र आता हे आदिवासी बांधव बेघर झाले आहेत. त्यांना या जमिनी परत मिळाव्यात यासाठी शासन दरबारी अनेक प्रयत्न देखील आम्ही केले.