शेकापक्षाचे तालुका चिटणीसाची आंदोलन उभारण्याची मागणी
| उरण । वार्ताहर ।
रेशनिंग दुकानांतून शंभर रुपयात देण्यात येत असलेला आनंदाच्या शिधा कीटचे वाटप हे रेशनिंग कार्ड धारकांबरोबर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांना आजतागायत उपलब्ध झाले नाही. त्यामुळे रेशनिंग कार्ड धारकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तरी आनंदाच्या शिधा कीटचे लवकरात लवकर वाटप करण्यासाठी शेकापक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी आंदोलन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आदिवासी बांधव व्यक्त करत आहेत.
गोर गरीब जनतेची दिवाळी गोड, आनंदात साजरी व्हावी यासाठी राज्य सरकारने रवा, साखर, चणाडाळ, पामतेल कीटचे वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु दिवाळी सण संपसी तरी तालुक्यातील रेशनिंग दुकानांत आजतागायत आनंद शिधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रेशनिंग कार्ड धारकांबरोबर आदिवासी बांधवांना आपले हात हालवत पुन्हा आप आपल्या घराकडे माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांबरोबर वेश्वी, विंधणे, चिरनेर, रानसई, कोप्रोली, पुनाडे, नागाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
यासंदर्भात तालुक्यातील सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी आवाज उठवित नाहीत. तरी रेशनिंग कार्ड धारकांबरोबर आदिवासी बांधवांना शासनाकडून देण्यात येत असलेला आनंद शिधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी नाईक यांनी आंदोलन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी चक्क रेशनिंग कार्ड धारकांबरोबर आदिवासी बांधव व्यक्त करत आहेत.