सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी; रायगड जिल्हा शांतता समिती बैठक संपन्न
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. जिल्ह्यात एक लाख तीन हजार 24 खासगी, तर 273 सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत. कोकणातील गणेशोत्सवाचा सण शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पांडुरंग गोपणे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता सा.बां.वि. जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार उपस्थित होते.
जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासनदेखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेशभक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क आहे.
गणेशभक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असावी. वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे जावळे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसांचे 17 सप्टेंबर रोजी आणि 21 दिवसांचे गणपती 27 सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. यातील समुद्रात 52 गणेशमूर्ती विसर्जन, खाडीमध्ये 105 गणेशमूर्ती विसर्जन, नदीमध्ये 244 गणेशमूर्ती विसर्जन, तलावामध्ये 100 गणेशमूर्ती विसर्जन व इतर ठिकाणी 94 गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे. 16 सप्टेंबर रोजी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. जिल्ह्यात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून, विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरिता पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जावळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास दिले. तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्युत विभागाने वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची विद्युत विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगितले. गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत साडेचार हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध ठिकाणांहून चाकरमानी कोकणात आपल्या गावी मोठ्या संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून 7 व 8 सप्टेंबरला अनुक्रमे शनिवार व रविवार आल्याने राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलीस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी व एटीसीचे पथक नेमण्यात आले असून, सोशल मीडिया देखरेख करण्याकरिता सायबर सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका, मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत असल्याचे घार्गे यांनी स्पष्ट केले.