प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष?
| अलिबाग | प्रतिनिधी |
निवडणूकीत आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. हजारो फलक काढल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु, बेलकडे फाट्यावरील आमदारांच्या भूमीपुजनाच्या फलकाला झाकून ठेवण्यास प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची चर्चा होत आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी बैठक घेऊन आचार संहितेचे पालन करण्याची सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दि.5 फेब्रुवारीला मतदान असणार आहे. या कालावधीत आचार संहितेचा भंग होऊ नये म्हणून नियमावली तयार करण्यात आली आहे. यादरम्यान, जिल्ह्यातील नाक्या नाक्यावर असणारे राजकीय फलक काढण्यात आले आहेत. तसेच, भूमीपूजन व उद्घाटनाचे फलक झाकून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो फलक काढण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा फेल ठरत असल्याचे समोर आले आहे. अलिबाग-आक्षी मार्गावरील बेलकडे फाटा येथे भूमीपुजनाचे फलक लावण्यात आले आहे. आमदार दळवी यांच्या नावाचे ते फलक आहे. मात्र, हे फलक झाकून ठेवण्यास प्रशासन उदासीन ठरल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतेय का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
