तळ्याचा कारभार प्रभारींच्या हाती

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर होतोय परिणाम

। तळा । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील दुर्गम व मागासलेला म्हणून तळा तालुक्याची दरबारी नोंद आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तहसील कार्यालय, पंचायत समितीची असते. मात्र, प्रदीर्घ कालावधीनंतरही अजूनही तालुक्याचा विकास हवा तसा होऊ शकला नाही, ही शोकांतिका आहे. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना रिक्त पदांनी ग्रासले आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून, ती अद्याप भरण्यात न आल्याने विकास खुंटला आहे. तळा तालुक्यातील बहुतांश अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकार्‍यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. त्यातच निम्याहून अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने तालुक्याचा विकास रखडला आहे.

तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी, शाखा अभियंता ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तालुक्याच्या विकासाबाबत निर्णय घेऊन प्रशासकीय यंत्रणा राबविण्याचे महत्त्वाचे काम या अधिकार्‍यांमार्फत केले जाते. मात्र, ही सर्व पदे रिक्त आहेत. या सर्व पदांवर कनिष्ठ अधिकार्‍यांना बसविण्यात आले आहे किंवा दुसर्‍या तालुक्यातील अधिकार्‍यांकडे कार्यभार सोपविण्यात आले आहेत. निसर्ग सौंदर्याने आणि जंगलाने व्यापलेला हा तालुका शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, स्वच्छ पाणी या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. काही गावांपर्यंत अजूनही रस्ते पोहोचले नाहीत. निवडणुकीच्या वेळी आश्‍वासन देणारे लोकप्रतिनिधी पाच वर्षे गायब होतात. त्यामुळे जनतेचा लोकप्रतिनिधींवरचाही विश्‍वास उडाला आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. परदेशी आणि श्री. यादव यांची कारकीर्द सोडली, तर या पदासाठी आजपर्यंत नियमित अधिकारी लाभला नाही.

ग्रामीण रुग्णालय बांधून आज दोन वर्षांचा कालावधी लोटला, परंतु या रुग्णालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांची पदे अजून भरलेली नाहीत. महसूल, कृषी खाते, प्राथमिक आरोग्य केंद्र या महत्त्वाच्या कार्यालयातदेखील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. आपला कृषीप्रधान देश आहे. मात्र, शेतकरी वर्गाच्या सोयी-सुविधांसाठी असलेल्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त असल्याने शेतकर्‍यांच्या कामाचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या खात्याची पदे रिक्त
तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांना रिक्त पदांनी ग्रासले आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून, ती अद्याप भरण्यात न आल्याने विकास खुंटला आहे. तळा तालुक्यातील बहुतांश अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकार्‍यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. महसूल, कृषी खाते, प्राथमिक आरोग्य केंद्र या महत्त्वाच्या कार्यालयातदेखील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे.
Exit mobile version