विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावला जात असल्याची खंत पालक वर्गातुन केली जात आहे. शासनाची प्राथमिक शाळांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची वाणवा तालुक्यात दिसुन येत आहे.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त असुन विस्तार अधिकारी यांच्या खांद्यावरच या पदाची जबाबदारी आहे. तसेच केंद्र प्रमुख 7 पदे असुन 4 पदे रिक्त आहेत. त्यामुळे 3 केंद्र प्रमुख तालुक्यातील 90 शाळांवर कधी पोहचणार हाच खरा प्रश्न आहे.
तालुक्यात एकुण मिळून 90 शाळा आहेत. यामध्ये विद्यार्थी मुले 875 तर मुली 908 असून एकूण विद्यार्थी संख्या 1783 आहे. केंद्र प्रमुख मंजूर पदे 7 असुन 3 कार्यरत आहेत. कनिष्ठ विस्तार अधिकारी हे पद सुद्धा रिक्त आहे. शिक्षक मंजूर पदे 237 असुन 182 शिक्षक कार्यरत आहेत. 55 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
नव्याने निर्माण झालेल्या तळा तालुक्याला आजतागायत शिक्षण विभागाचा आकृतीबंध मंजूर न झाल्याने कार्यालयीन कर्मचारी नसल्याने या कार्यालयात काम करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.
सुरेखा तांबट, प्रभारी गटशिक्षणाधिकारी तळा
तळा पं.समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी, कनिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी अशी अनेक पदे रिक्त आहेत. वेळोवेळी याबाबतची माहिती व मागणी शासनाला करीत असतो.
अक्षरा कदम, सभापती पंचायत समिती, तळा