| महाड | वार्ताहर |
चवदार तळे स्मृती दिनाच्या निमित्ताने महाडमध्ये येणार्या भीमसैनिकांना कोणत्याच प्रकारची अडचण होऊ नये म्हणून स्थानिक महाड नगरपालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्या बैठकीमध्ये विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाड पत्रकार संघाकडून देखील विविध समस्यांवर चर्चा करून सूचना मांडण्यात आल्या.
चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा स्मृतिदिन गेली अनेक महाडमध्ये साजरा केला जात आहे. या स्मृतिदिनानिमित्त महाडमध्ये संपूर्ण राज्यातून लाखो भीमसैनिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.चवदार तळे येथे 20 मार्च रोजी भीमसैनिकांची मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच वाहनांचे पार्किंग आदी विषयावर मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून आढावा घेतला. चवदार तळे प्रांगणात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
महाडमध्ये स्मृतीदिनाच्या निमित्ताने आलेले भीमसैनिक चवदार तळ्यातील पाणी कलशामध्ये घेऊन जात असल्याने या पाण्यावर तात्पुरत्या स्वरूपात इंडस्ट्रीयल आर.ओ. प्लांट बसवण्यात येणार असल्याचे देखील महादेव रोडगे यांनी सांगितले. भीमसैनिकांनी या आर.ओ. प्लांट मधूनच पिण्याच्या पाण्याचा वापर करावा अशा सूचना केल्या जाणार असल्याचे देखील स्पष्ट केले. चवदारतळे आणि क्रांतीस्थंभ याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मोबाईल वाहने स्नानगृह, स्वच्छतागृह उभे केले जातील असेही सांगितले.