24 पथकांमार्फत जिल्ह्यावर कडक नजर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यास कडक पावले उचलली आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात 24 भरारी पथकांमार्फत संशयित हालचालींवर काटेकोर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्ह्यात बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून, 18 मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी 52 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 18 मार्चपर्यंत चालणार असून, यासाठी जिल्ह्यातील 75 परीक्षा केंद्रांवर एकूण 37 हजार 579 विद्यार्थी बसणार आहेत.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर एकूण 24 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 15 पथके आणि उर्वरित जिल्हा स्तरावरील पथके कार्यरत राहणार आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही प्रणालीचे थेट नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे असणार आहे.
याशिवाय, जिल्ह्यात विशेष ‘बैठक पथक’ तयार करण्यात आले असून, या पथकाद्वारे सीसीटीव्ही फुटेजची नियमित पाहणी केली जाणार आहे. कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास बैठक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कठोर कारवाई करणार आहे. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कॉपीस प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
दरम्यान, परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा काळात केंद्रांच्या आसपास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले जाणार असून, झेरॉक्स दुकाने तसेच इतर संशयास्पद दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही परीक्षा केंद्र परिसरातील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि रायगड जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.






