गावपातळीवर पर्यटन समित्या स्थापन; सुरक्षा यंत्रणा विकसित करण्यावर भर
। रायगड । प्रतिनिधी ।
निसर्गरम्य समुद्र किनारा, घनदाट जंगले, गडकिल्ले आणि धबधबे अशी नैसर्गिक देणगी लाभलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाचे बेत आखणे काही नवीन नाही. पावसाळा सुरु झाला कि, पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे जथ्थे रायगड जिल्ह्यात दाखल होतात.पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक धबधबे आणि गडकिल्ल्यांवर दुर्घटना घडतात. यामुळे गेले अनेक वर्ष रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. या बंदीचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याने पावसाळी पर्यटनावर बंदी नको अशी मागणी वारंवार होत होती. यामुळे यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी न घालता शिस्तबद्ध पर्यटनाची हाक प्रशासनाने घातली आहे.
धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घातली तरी हौशी पर्यटक चोरवाटेचा अवलंब करतात. गतवर्षी पर्यटन स्थळावर गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदीचा 144 कलम लावण्यात आला होता. तसेच पर्यटन स्थळाकडे जाणार्या मार्गावरही पोलीस तैनात होते, मात्र तरीही काही पर्यटक जीव धोक्यात घालून छुप्या मार्गाने धरण, धबधबे गाठतात आणि अतिउत्साहात स्वतःचा जीव गमावतात. अशा पर्यटकांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक तरुणांची मदत घेतली जात आहे. तसेच गावपातळीवर पर्यटन समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.
स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवरील अपघात नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तरुणांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पर्यटकांवर कारवाईपेक्षा सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिकांच्या मदत घेतली जाईल.
सागर पाठक,
अधिकारी,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण.