शिवराज्याभिषेकासाठी प्रशासन सज्ज

तीन हजार कर्मचारी व स्वयंसेवक किल्ले रायगडावर तैनात

| अलिबाग। प्रमोद जाधव ।

रायगड किल्ल्यावर सहा जूनला साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली असून पोलिसांसह सुमारे तीन हजार सरकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्था तसेच नियोजन राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. गडावर येणार्‍या शिवप्रेमींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता तब्बल 16 ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत. सोहळ्यादरम्यान गडावर दाखल होणार्‍या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

गडावर येणार्‍या शिवप्रेमींकरिता वाहने पार्किंग सुविधा, गडावर ये-जा करण्याकरिता एसटी सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलीस सुरक्षा तसेच, आरोग्य पथक अशा विविध सरकारी यंत्रणा तयारीला लागल्या आहेत. रायगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अरुंद व खडतर असल्याने तसेच, गडावर मर्यादित सुविधा असल्याने प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज व युवराज शहाजी राजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. याकरिता गडावर व परिसरामध्ये कायदा-सुव्यवस्था योग्य रीतीने राखली जावी, याकरिता दोन हजार पोलीस कर्मचारी तसेच सातशे सरकारी कर्मचारी, वाहतूक पोलीस, दंगल नियंत्रण पत्रके आपदामित्र, स्थानिक बचाव पथक तसेच, स्थानिक व शिवराज्याभिषेक समितीचे स्वयंसेवक असे सुमारे तीन हजार कर्मचारी व स्वयंसेवक या ठिकाणची व्यवस्था पाहणार आहेत.

शिवप्रेमींना वैद्यकीय मदत
वाढत्या तापमानामुळे गडावर येणार्‍या शिवप्रेमींना आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवप्रेमींना वैद्यकीय मदत लागल्यास आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून 16 ठिकाणी वैद्यकीय पथके तयार ठेवली जाणार आहेत.
पार्किंग सुविधा
माणगाव-पुनाडेमार्गे रायगड किल्ल्याकडे येणार्‍या शिवप्रेमींकरता पार्किंगची व्यवस्था कवळीचा माळ व शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. तर महाडकडून येणार्‍या वाहनांसाठी कोंझर व वाळसुरे या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
सोहळ्यांकरता एसटीच्या तीनशे बस
रायगड किल्ल्यावर सहा जूनला तारखेनुसार तर 20 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्‍या शिवप्रेमींसाठी एसटी महामंडळाच्या 300 गाड्या जिल्हा प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या आहेत.
रायगडावर तारखेनुसार व तिथीनुसार असे दोन शिवराज्याभिषेक सोहळे साजरे केले जातात. सहा जूनला तारखेनुसार तर वीस जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी साजरा होणार आहे. रायगडावर साजरा होणार्‍या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल होत असतात. या शिवप्रेमींची ये जा करण्यासाठी महाड एसटी आगाराकडून सोय केली जाते.शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणार्‍या शिवप्रेमी करता वाळसुरे, कोंझर तसेच कवळीचा माळ या ठिकाणी वाहनांकरता पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. रायगडच्या पायथ्याशी तसेच पाचाड घाटामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता सुविधा करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणांहून रायगड पायथा व रोपवे तसेच हेलीपॅड या ठिकाणांहून एसटी बस फेर्‍या नियोजित केल्या आहेत.
Exit mobile version