। अलिबाग । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात अतिवृष्टीसह वादळाचा फटका विज तारा, विद्यूत खांबाना तसेच रोहीत्रांना अनेक वेळा बसला आहे. त्यामुळे अनेक गावे, वाड्या अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या कालावधीत विद्यूत सेवा सुरळीत करताना महावितरण कंपनीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र यंदा नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी महावितरण विभाग सज्ज असल्याचे चित्र आहे. दीड हजार कर्मचार्यांसह लागणारी साहित्यांचा पुरवठा महावितरण विभागाने ठेवला असून 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. यातून आपत्कालीन परिस्थितीशी सामना महावितरण विभाग करणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ए. आय मुलाणी यांनी दिली. तीन जून 2020 मध्ये झालेल्या निसर्ग चक्री वादळामध्ये महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. वीज तारांसह, विजेचे खांब, रोहित्राचे खुप नुकसान झाले. दोन ते तीन महिने अनेक गावे अंधारात होती. रायगड जिल्ह्यातील महावितरण विभागासह अन्य जिल्ह्यातील महावितरण विभागातील अधिकारी, कर्मचार्यांची मदत घेत विज सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर बोध घेत महावितरण विभागाने आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात महावितरण विभागाचे मध्यवर्ती कार्यालय पेण येथे असून या कार्यालयाच्या अखत्यारित चार उपविभागांचा समावेश आहे. महावितरण कंपनीच्या अखरत्यारित असलेल्या कार्यालयांमध्ये एकूण एक हजार 350 कर्मचारी आहेत. त्यात कंपनीचे 600 व बाह्यस्त्रोतमध्ये काम करणारे 750 कर्मचार्यांचा समावेश आहे. नेमण्यात आलेल्या 35 एजन्सीद्वारे 350 मनुष्यबळ, 40 वाहने उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच पुरपरिस्थितीच्या काळात मालाची व मनुष्यबळाची ने -आण करण्यासाठी प्रत्येक उपविभागात दोन बोटी अशा एकूण 8 रबरी बोटी आहेत. झाडे तोडण्यासाठी 40 कटर आहेत. रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी बॅटरी, रेनकोट, गमबुट असणार आहे. त्यापध्दतीने उपकरणांचा साठा सुविधा उपलब्ध केला आहे. रोहित्र अथवा अवजड उपकरणा उचलण्यासाठी साखळी युक्त यंत्रदेखील ठेवण्यात आले आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयासह अन्य उपविभागाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे. पावसाळ्यात आपत्तीशी सामना करण्यासाठी महावितरण विभाग सज्ज असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मुलाणी यांनी दिली.