| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये सुरू असलेल्या ई-रिक्षा संपाचा बुधवारी (दि.25) चौथा दिवस होता. या पार्श्वभूमीवर इ-रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळाची तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान शासनाची भूमिका संघटनेसमोर स्पष्ट करण्यात आली.
या बैठकीस तहसीलदार सुरेंद्र सिंग ठाकूर व मुख्याधिकारी राहुल इंगळे हे उपस्थित होते. यावेळी सर्व रिक्षाधारकांना न्याय देण्याबाबत शासन सकारात्मक असून, रिक्षा परवानग्या व संबंधित प्रक्रियेबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्यावतीने ई-रिक्षा संघटनेला संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, येत्या 15 ते 20 दिवसांचा अवधी देण्याची विनंती करण्यात आली. या कालावधीत संबंधित मॉनिटरिंग कमिटीची बैठक तातडीने आयोजित केली जाईल आणि त्या बैठकीत रिक्षाधारकांच्या प्रश्नांवर सकारात्मक व ठोस निर्णय दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने रिक्षा देण्याचा मुद्दाही चर्चेत आल्याची माहिती आहे. या आश्वासनानंतर आता रिक्षा संघटना कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







