निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमधून संताप
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये मागील काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे माथेरानचा कायापालट होताना दिसून येत आहे; परंतु जी कामे पूर्ण केली जात आहेत, त्यावर नगरपरिषदेच्या कोणत्याही अधिकार्यांचा अंकुश नसल्याने होणारी कामे अल्पावधीतच डबघाईला येण्याची शक्यता सुज्ञ नागरिकांमधून वर्तवली जात आहे. 2013 मध्ये नगरपरिषदेच्या मागणीनुसार, 123 कोटी रुपयांचा भरीव निधी एमएमआरडीएमार्फत मंजूर करण्यात आल्यामुळे बहुतांश कामे आजही प्रगतीपथावर दिसत आहेत. त्यानंतर 2016 मधील सत्ताधारी गटाने जवळपास 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. गावातील मुख्य रस्ते, त्याचप्रमाणे पॉईंटकडे जाणार्या रस्त्यांची कामे, दस्तुरी पार्किंग, दस्तुरी ते पांडे रोडपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे धूळविरहित रस्ते, विविध ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे सुरू आहेत. क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे करताना चांगल्या दर्जाचे ब्लॉक आणले गेले नाहीत, त्यामुळे अनेक भागात खूपच घाईगडबडीत हे ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. त्या निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्सवर मोठ्या प्रमाणावर ग्रीट अंथरली आहे, जेणेकरून कच्च्या स्वरूपाचे हे ब्लॉक कुणाला दिसणार नाहीत आणि त्यावर कुणीही हरकती घेऊ नये, हाच या मागचा मुख्य उद्देश असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे हे ब्लॉकचे रस्ते आहेत की ग्रीटचे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
संबंधित ठेकेदाराने खूपच चपळाईने ब्लॉकची कामे पूर्ण करण्यासाठी सपाटा लावला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ग्रीट टाकल्यामुळे या रस्त्यावरून चोवीस तास रुग्णवाहिका वेगाने जात असते त्यामुळे या धुळीने श्वसनाचे आजार बळावले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निविदेतील नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या ठिकाणी ग्याबियनच्या काळ्या दगडाच्या भिंती बांधल्या जात आहेत आणि ज्याठिकाणी खरोखरच आवश्यकता आहे त्या भागाला संरक्षण दिले जात नाही. कस्तुरबा रोडवरील बहुतांश हॉटेल्सला जांभ्या दगडात संरक्षण भिंती बांधल्या आहेत, त्यामुळे त्या हॉटेल्ससमोरील वनखात्याच्या अखत्यारीत असलेली दर्शनी भागातील जागा वाढलेली आहे. कामे सातत्याने होणार नाहीत आणि त्यासाठी भरीव निधीची तरतूदसुद्धा लवकर होत नसते, त्यामुळे होणारी कामे निदान दहा वर्षे तरी तग धरतील अशा स्वरूपाची असावीत अन्यथा दरवर्षी ह्याच रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरपरिषदेच्या तिजोरीवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कामामुळे माथेरानच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे, त्यामुळे ही कामे करीत असताना ठेकेदारांनी दूरदृष्टीचा वापर केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ग्रीट टाकल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या तयार होत आहेत, अनावश्यक ठिकाणी गॅबियन वॉल टाकण्यात येत आहे.
शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान
काही ठिकाणी ब्लॉक चांगल्या प्रतीचे आहेत तर काही ठिकाणी खूपच कच्च्या स्वरूपाचे आहेत सततच्या रहदारीमुळे त्यांची लवकरच झीज होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराजवळ मोठे पाईप टाकल्यास पाणी रस्त्यावर तुंबणार नाही. सगळी कामे चांगल्या पद्धतीने करण्यात यावी.
जनार्दन पार्टे, माहिती अधिकार कार्यकर्ते